चौफेर हल्‍ले तरीही खैरे चालले!

Foto

औरंगाबाद: पाचव्यांदा लोकसभेत जाण्यासाठी कंबर कसलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. अँटीइन्कम्बसी फॅक्टर, तीन आमदार विरोधात अन जातीवर झालेले मतदान पाहता खैरे दोन लाखांच्या पुढे जायला नको होते. तरीही खैरेंनी अखेरपर्यंत किल्‍ला लढवला. याचा अर्थ चौफेर हल्‍ले तरीही खैरे चालले... असाच काढावा लागेल.

औरंगाबाद लोकसभेचा सामना सुपरडुपर हिट ठरला. अवघ्या मराठवाड्याचे लक्ष वेधलेल्या या लढतीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारत इतिहास घडवला आहे. 1980 नंतर या मतदारसंघात दुसर्‍यांदा मुस्लिम खासदार निवडून आला आहे.  ही निवडणूक अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. भीमा-कोरेगाव प्रकरण, मराठा क्रांती मोर्चा या दोन वर्षातील घटना राजकीय वातावरण ढवळून काढणार्‍या ठरल्या. त्याचा प्रभाव थेट लोकसभेच्या निवडणुकीवर झाला. भीमा-कोरेगाव प्रकरणात मुस्लिम समाज दलितांच्या पाठीशी उभा राहिला आणि हे दोन्ही समाज एकत्र येण्यास सुरुवात झाली. डॉ. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी दलित-मुस्लिम ऐक्याचा प्रयोग याच शहरातून केला. त्याच वेळी वंचित बहुजन आघाडी करिश्मा दाखवणार, अशी चर्चा रंगू लागली होती. वंचित बहुजन आघाडीला मिळालेला प्रतिसाद मतदानात परावर्तित झाल्याने आमदार इम्तियाज जलील आता खासदार झाले आहेत. दुसरीकडे मराठा समाजातील एकजूट हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात मते टाकण्यापर्यंत टिकून राहिली. शिवसेनेचे हक्‍काचे मतदान अपक्षाच्या झोळीत गेले. त्याचा मोठा फटका खैरेंना बसला. दलित समाज जलील यांना मतदान करणार नाही, अशी अटकळ साफ खोटी ठरली. या समाजाने एमआयएमच्या पारड्यात भरभरून मते टाकली.  मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली होती. ग्रामीण भागात ट्रॅक्टर सुसाट धावले अन् तिथेच खैरेंचा पराभव झाला. पहिल्या पाच फेर्‍यांमध्ये ग्रामीणमधील गंगापूर, वैजापूर व कन्‍नड तालुक्यातील मतांची आकडेवारी समोर आली. त्यात खैरे पिछाडीवर पडले होते. शहरातील पूर्व, पश्‍चिम आणि मध्य या मतदारसंघातही ट्रॅक्टरला प्रतिसाद मिळाल्याने खैरेंची हक्‍कांची व्होट बँक फुटल्याचे स्पष्ट झाले.

सेनेच्या गोटात अस्वस्थता 
 मतमोजणी केंद्रात उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, खैरे यांचे चिरंजीव नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्या चेहर्‍यावरील चिंता सारे काही सांगत होती. निकालाचा कल लक्षात येताच शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली. महिला शिवसैनिकही हळूहळू बाहेर पडल्या. तरीही दहाव्या फेरीनंतर खैरे आघाडी घेतील, असा विश्‍वास कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पहिल्या नऊ फेर्‍यांमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना भरघोस मते मिळाली. त्याचा फटका खैरेंना बसला. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात ट्रॅक्टरला मिळालेली मते सेनेची होती, याचाही अंदाज कार्यकर्त्यांना येऊ लागला. पहिल्या 7 ते 8 फेरीपर्यंत जलील व हर्षवर्धन जाधव दोघेही जवळपास सारखीच मते घेत होते. आमदार अतुल सावे पत्रकार कक्षात आले तेव्हा पूर्व मतदारसंघात खैरे पिछाडीवर होते. मात्र, मतमोजणीच्या दुसर्‍या टप्प्यात खैरे आघाडी घेतील, असा दावा त्यांनी केला. मात्र, तसे घडले नाही. शहरातील पूर्व, मध्य आणि पश्‍चिम या तिन्ही विधानसभा मतदारसंघात जलील व हर्षवर्धन जाधव यांना चांगली मते मिळाली. तिथेच खैरेंचा पराभव स्पष्ट झाला. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker